महाराजांची शिकवण

महाराजांची शिकवण

योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून, साधेपणा, सत्य, प्रेम आणि करुणा घेऊन दररोजचे जीवन कसे जगावे हे शिकवले आहे . त्यांनी भक्तांना समाजात एकमेकांना साहाय्य कसे करावे, योगाभ्यासाने आरोग्य कसे टिकवायचे, सुज्ञपणे खर्च कसा करावा, आध्यात्मिक प्रगती करण्याचा मार्ग, मुक्ती मिळवण्याचे मार्ग (मोक्ष) आणि इतर अनेक मौल्यवान धडे दिलें आहेत. शेगांव गजानन महाराज संस्थानाने अधिकृत केलेले महाराजांचे चरित्र म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, कानडी  अशा विविध भाषांतरीत भाषांत उपलब्ध आहे.

श्री गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात महाराज उष्ट्या पत्रावळीतील शिते वेचून खात आहेत. त्यांच्या ह्या कृतीतून ते सांगतात कि अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाची कधी नासाडी करू नये. 

दुसऱ्या अध्यायात महाराज सांगतात कि भावभक्तीच्या नाण्यावर मी संतुष्ट आहे. पुढे ते कीर्तनकार गोविंदबुवा टाकळीकर ह्यांना उपदेश करतात कि आपल्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ असावा. उगाच फक्त पोपटपंची करू नये. महाराज सांगतात आपला मोठेपणा दाखविण्यासाठी घरी आलेल्या अतिथीस कधीच खाण्या पिण्याचा वाजवीपेक्षा जास्त आग्रह करू नये. 

तिसऱ्या अध्यायात महाराज काशीच्या गोसाव्याची त्यांना  गांजा पाजण्याची इच्छा पुरवून सिद्ध करतात कि ते खरंच आपल्या भक्तांचा हट्ट पुरविणारी प्रेमळ माउली आहेत. महाराजांच्या तीर्थात खूप शक्ती आहे. श्रद्धेने आणि भक्तिभावाने महाराजांचे तीर्थ घेतल्यास गंडांतर टळते. ह्या अध्यायात महाराज माळी विठोबा घाटोळ ह्यांस ढोंग करून लोकांना फसवतो म्हणून मार देतात आणि सांगतात कि प्रत्येकाला आपापल्या कर्मा प्रमाणे फळ मिळते. 

चौथ्या अध्यायात महाराज समजावतात कि प्रपंच करत असताना परमार्थ सुद्धा करावा. परमेश्वराला कधीही विसरू नये. ह्या अध्यायात महाराज आपल्या यौगिक सामर्थ्याने काडी घासल्यावाचून अग्नी प्रगट करतात. 

पाचव्या अध्यायात सुद्धा महाराज आपल्या यौगिक सामर्थ्याने भक्त भास्कर पाटलाच्या बारा वर्ष कोरड्या असलेल्या विहिरीत जल उत्पन्न करतात. ह्यावरून ते परमेश्वराचे अंश आहेत हे दिसून येते.

सहाव्या अध्यायात मधमाशांच्या प्रसंगातून महाराज सांगतात कि संकट आल्यावर ईश्वराची भक्तीच तारून नेते. ईश्वराशिवाय कोणीही मदतीस येत नाही.

सातव्या अध्यायात महाराज उपदेश करतात कि पहिली संपत्ती ही निरोगी शरीर आहे. आपल्या तब्येतीची आपण नेहमी काळजी घ्यावी.  तसेच ते खंडू पाटलास उपदेश करतात कि पैसा हे सर्वस्व नाही, परमेश्वराची कृपा आणि त्याच्या आशीर्वादाने सगळे प्राप्त होते. 

आठव्या अध्यायात महाराज खंडू पाटील ह्यांस पोलिसांकडून अटक होण्यापासून रक्षण करतात आणि सांगतात कि कर्त्या पुरुषाला संसार करत असताना बरीच संकटे येतात, त्यामुळे डगमगून जाऊ नये. सदैव देवाचा धावा करावा. तसेच ह्या अध्यायात ब्रह्मगिरी गोसाव्यास उपदेश करतात कि गर्व कधीही करू नये. 

नवव्या अध्यायात ‘गण गण गणांत बोते ‘ ह्या महाराजांच्या मंत्राचा अर्थ सांगितला आहे. जीव आणि ब्रह्म एकच आहे, हा महत्वाचा उपदेश केला आहे. ह्याच अध्यायात महाराज सांगतात कि देवाला बोललेला नवस कधी चुकवू नये. पुढे महाराजांनी बाळकृष्ण बुवा ह्यांना समर्थ रामदासांच्या रूपात दासनवमीला दर्शन दिले. ह्यावरून असे दिसून येते कि समर्थ रामदास स्वामी आणि महाराज एकच आहेत. 

दहाव्या अध्यायात महाराज गणेश आप्पा ह्यांना सांगतात कि आपल्या मनात असेल तें बोलावे, लाजू नये. ह्याच अध्यायात महाराज बाळाभाऊंना पायाने तुडवण्याची लीला करून भास्कर पाटलास उपदेश करतात कि कधीही दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या करू नये. सुकलालाच्या द्वाड गायीस शांत करून महाराज सांगतात कि भूतदया पाळावी. मुक्या जनावरांस त्रास देऊ नयें. 

अकराव्या अध्यायात महाराज ‘संचित ‘, क्रियमाण ‘ आणि ‘ ‘प्रारब्ध’ ह्या कर्मांचे फळ मनुष्यास भोगावे लागते ह्याचे वर्णन करतात, मह्राराजांनी कृपा होऊन भास्कर पाटलास मोक्ष प्राप्त होतो. गणू जवरे आणि बाराव्या अध्यायातील भक्त पितांबर ह्यांस महाराज ‘स्मर्तृगामी ‘ आहेत ह्याची प्रचिती देतात.. 

बाराव्या अध्यायात महाराज बच्चूलाल अगरवाल ह्यास धनाचा दिखावा करू नयें हा उपदेश करतात. देव हा भावाचा भुकेला आहे. बच्चूलाल अगरवालाची राम मंदीर बांधण्याची इच्छा महाराज पूर्ण करतात. ह्यांच अध्यायात महाराज संबोधतात कि ते परमहंस संन्यासी आहेत. 

तेराव्या अध्यायात, गंगाभारती आणि पुंडलिक ह्या दोघांवर महाराजांनी लीला करून त्यांना असाध्य व्याधींपासून मुक्ती दिली. परमेश्वरावरची अपार श्रद्धा मनुष्याला कोणत्याही व्याधींपासून दूर करते, हे समजते. 

चवदाव्या अध्यायांत, नर्मदा मैय्या महाराजांचे दर्शन घेण्यास येते आणी सगळ्यांचं बुडत्या नौकेस हात लावून रक्षण करते. 

सोळाव्या अध्यायात,महाराज भाऊ कवर ह्यांच्या नैवेद्याची प्रतीक्षा करून ते कसे ‘भक्तवत्सल’ आहेत ह्याची आपल्याला प्रचिती येते. 

सतराव्या अध्यायात महाराजांनी सर्व धर्म एकत्रित येऊन शांततेत जगायला सांगितले आहेत, कारण देव एकच आहे. मंदिरे किंवा मशिदी किंवा चर्च तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री वीट, वाळू आणि सिमेंट समान आहे. महाराजांनी हे देखील सांगितले आहे कि कोणीही त्यांना वस्त्र किंवा साखळीने बांधून ठेवू शकत नाही. मानवजातीचे कल्याण करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला आहे. 

अठराव्या अध्यायात बापुना काळे ह्यांच्या गोष्टीवरून असे समजते कि परमेश्वरा विषयीची तीव्र ओढ आपल्याला त्याचे दर्शन घडवते. देवाला खरी भक्ती आवडते आणि तो त्याच्या खऱ्या भक्ताला कोणत्याही रूपात दर्शन देतो.

एकोणिसाव्या अध्यायात महाराज बाळाभाऊंना मोक्ष देणाऱ्या तीन मार्गांचे म्हणजेच कर्म , भक्ती आणि योग ह्याचे महत्त्व समजावून सांगतात. तसेच समाधी घेतल्यावर देखील महाराज इथेच राहतील आणि वेळोवेळी त्यांचा भक्तांना ते दर्शन देतील ह्याची खात्री  देतात. 

विसाव्या आणि एकविसाव्या अध्यायात महाराज ते सदैव भक्तांच्या पाठीशी आहेत ह्याची ग्वाही देतात. ह. भ. प. दासगणु महाराज श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण भक्तिभावाने करण्याचे महत्व एकविसाव्या अध्यायात समजावून सांगतात. श्री गजानन विजय ग्रंथ हा महाराजांच्या भक्तांसाठी कोणत्याही परिस्थीतीशी झटण्याचे बळ देतो. 

श्री गजानन जय गजानन.