योगीराजाच्याअद्भुत लीला

योगीराजाच्याअद्भुत लीला

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित गजानन विजय ग्रंथ हा  ह. भ. प.  दासगणु महाराज ह्यानी ओवीबद्ध केला आहे.  दासगणू महाराज हे शिर्डीच्या श्री साई बाबा यांचे सुप्रसिद्ध शिष्य आहेत. महाराजांच्या श्री गजानन विजय ग्रंथात असे अनेक संदर्भ आहेत ज्यावरून असे दिसून येते की महाराजांना अनेक यौगिक शक्ती आत्मसात होत्या जसे कि पाच इंद्रिये, प्राणी, निसर्ग, अग्नि इत्यादींवर महाराजांना परिपूर्ण नियंत्रण होते ज्याचा उपयोग ते आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी आणि आत्म-प्राप्तीचा मार्ग दर्शविण्यासाठी करत . श्री गजानन विजय ग्रंथात नमूद केलेल्या महाराजांच्या लीला व त्यांची योगशक्ती यांची अधिक माहिती खाली दिली आहे.

कोरडी विहीर जलमय केली 

वैशाख मासातील घटना. श्रीमहाराज फिरत फिरत अकोली गावास गेले. त्यांना तहान लागली होती मात्र कुठेही त्यांना पिण्यास पाणी मिळेना. इतक्यात त्यांचे लक्ष शेतात काम करणाऱ्या भास्कर पाटलांकडे गेले. श्रीमहाराजांनी भास्कराकडे पाणी मागितले परंतु, त्यांनी पाणी तर दिले नाहीच शिवाय रागावून बरेच काही सुनावले. हताश झालेले श्रीमहाराज जवळच्या विहिरीवर गेले. हे पाहून भास्कर म्हणाले, ‘अरे वेड्या, ती विहीर बारा वर्षांपासून कोरडी आहे.’ हे ऐकल्यावर खिन्न झालेल्या श्रीमहाराजांनी परमेश्वराची आळवणी केली. ‘अकोली गाव पाण्यावाचून तहानलेले आहे’ असे सांगत ईश्वराची प्रार्थना केली. श्रीमहाराजांनी तळमळीने केलेल्या या आवाहनाला परमेश्वराचा प्रतिसाद लाभला अन् बारा वर्षे कोरडी पडलेली ती विहीर रक्षणार्धात पाण्याने भरुन वाहू लागली. हे दृश्य पाहून अचंबित झालेले भास्कर श्रीमहाराजाना शरण गेले आणि संसाराचा त्याग करून त्यांच्या सेवेत रुजू झाले.

वठलेल्या आंब्याला पालवी फुटली 

संतश्रेष्ठ श्रीमहाराजांच्या दरबारात अनेक शिष्य व भक्तगण होते. त्यातील पितांबर शिंपी सारखे काही शिष्य श्रीमहाराजांच्या अगदी निकट होते. याच कारणाने अन्य काही भक्त आकसाने पितांबरचा द्वेष करीत असत. एकदा एका किरकोळ प्रकरणावरुन भक्तमंडळींमध्ये वादंग झाला आणि त्याचा परिणाम श्रीमहाराजांनी म्हणून पितांबराला आपल्यापासून दूर जाण्यास सांगितले. श्रीमहाराजांपासून दूर निघालेला पितांबर दुःखी अंतःकरणाने मजल दरमजल करीत कोंडोली गावास जाऊन पोहोचला. मात्र कोंडोली येथे त्याला कुणीही श्रीगजानन महाराजांचा शिष्य म्हणून मान्यता दिली नाही उलटपक्षी ‘श्रीमहाराजांचा शिष्य असशील तर गावातील वठलेल्या आंब्याचे झाड पुन्हा पर्णयुक्त करून दाखव’ असे पितांबरास आव्हान दिले. पितांबरने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही त्याचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. तेव्हा पितांबराने गुरुमाऊली श्रीमहाराजांचे मनोमन स्मरण करून त्यांचा नामगजर केला आणि आश्चर्य घडले. पर्णहीन व वठलेल्या अशा त्या आंब्याच्या झाडाला हिरवीगार पालवी फुटली. सर्वांनी श्रीमहाराज आणि पितांबर यांचा जयजयकार केला. पुढे, पितांबर कोंडोली येथेच कायमस्वरुपी स्थिर झाला.

श्रीमहाराजांना अग्नीपासून भय नाही

एकदा काही गोसाव्यांनी श्रीमहाराजांसमोर आख्यान मांडताना, ‘शस्त्र वा अग्नी, आत्म्याचा नाश करू शकत नाही’ असे सांगितले. तोच, श्रीमहाराजांनी एक लीला केली. त्यांच्या चिलमीतून आगीचे किटाळ गादीवर पडले आणि क्षणार्धात गादीसह पलंगाने पेट घेतला. भोवतालची मंडळी घाबरली मात्र श्रीमहाराज आगीच्या ज्वाळांमध्ये शांत बसले होते. त्यांनी गोसाव्यांचा मुख्य ब्रह्मगिरी गोसावी याला ‘शस्त्र वा अग्नी, आत्म्याचा नाश करू शकत नाही’ हे सिद्ध करण्यास सांगितले तेव्हा ब्रह्मगिरी श्रीमहाराजांना शरण आला. ‘आपणांकडे केवळ पुस्तकी पांडित्य असून आपण अनुभवशून्य आहोत’ हे त्यांनी मान्य केले तेव्हा श्रीमहाराजांनी समजुतीचे चार शब्द सांगून त्यांस क्षमा केली.

श्रीमहाराजांस तीर्थस्नान घडले

महाराज एकदा श्रीनरसिंगजी महाराजांना भेटावयास अकोट येथे गेले होते. श्रीमहाराजांची स्वारी नरसिंगजींच्या झोपडी शेजारील विहिरीच्या काठावर बसली होती. श्रीमहाराज सतत विहिरीत डोकावून पाहात असल्याने श्रीनरसिंगजींनी विचारले, ‘गजानना, हे काय बरे करतोस?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘या विहिरीच्या पाण्यात सर्व नद्यांचे पाणी सामावलेले आहे. येथे मला तीर्थस्नान करावयाचे आहे मात्र, या विहिरीतील पाण्याने वर उसळून मला स्नान घालावे अशी माझी इच्छा आहे.’ श्रीमहाराजांचे हे विचित्र बोलणे ऐकून तेथे असलेली कुत्सित मंडळी हसू लागली, आश्चर्य व्यक्त करू लागली. तेवढ्यात ‘चमत्कार’ घडला. विहिरीतील पाण्यात एकाएकी उकळ्या फुटल्या, पाणी उसळून बाहेर आले आणि श्रीमहाराजांसमवेत सर्वांच्या अंगावर कारंजासारखे पाण्याचे तुषार पडू लागले. त्या अमृततीर्थाच्या वर्षावाने भक्तगण आनंदित झाले इतके नव्हे तर कुत्सित मंडळी देखील स्नानाचा आनंद लुटू लागला.

जानराव देशमुखास जीवनदान लाभले

महाराजांच्या कृपेची प्रचिती आल्यामुळे त्यांच्या दर्शनार्थ शेकडो भाविक मंडळी बंकटलालच्या घरी येऊ लागली. एव्हाना श्रीमहाराजांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. शेगावांतील जानराव देशमुख नावाचे गृहस्थ कित्येक दिवसांपासून आजारी होते. वैद्य, डॉक्टर अशा सर्वांनीच जानरावांच्या आजारपणापुढे हात टेकले. औषधे, गंडेदोरे कशाचाही उपयोग होईना. दिवसेंदिवस जानरावांची प्रकृती खालावत चालली आणि ते मृत्यूच्या दिशेने वाटचाल करू लागले. अशातच त्यांच्या एका नातेवाइकाने श्रीमहाराजांचे चरणतीर्थ जानराव देशमुखांना पाजले आणि काही दिवसांतच अक्षरशः ‘चमत्कार’ घडून आला. जानराव ठणठणीत बरे झाले. श्रीमहाराजांच्या चरणामृताने जानरावांना नवे आयुष्य लाभले. या व अशा अनेक घटनांमुळे श्रीमहाराजांमधील देवत्व सर्वांना प्रखरतेने जाणवू लागले.

भाऊ कवर यांची व्याधी दूर केली 

महाराजांचा भक्त भाऊ कवर याच्या शरीरावर फोड उत्पन्न झाला. बरेच औषधोपचार झाले, शस्त्रक्रिया केली गेली तरीही फोड वाढतच होता. ठसठसणाऱ्या फोडामुळे असह्य त्रास होऊन भाऊ कवर तळमळू लागला, क्षणोक्षणी श्रीमहाराजांचा धावा करू लागला. एका रात्री श्रीमहाराज बैलगाडीतून, गाडीवानाचा वेष धारण करुन भाऊकडे आले. भाऊच्या बंधूंनी त्यांना घरात घेतले असता आपल्या बंधूच्या फोडासाठी शेगांवहून तीर्थ, अंगारा पाठविला आहे’ असे श्रीमहाराजांनी सांगितले आणि तेथून लागलीच निघूनही गेले. भाऊच्या बंधूंनी गाडीवानाचा शोध घेतला असता त्याचा पत्ता लागला नाही. इथे भाऊच्या फोडावर अंगारा लावताच फोड फुटला, जखम पूर्णपणे बरी झाली आणि थोड्याच दिवसात भाऊ असह्य व्याधीतून कायमचा मुक्त झाला. पुढे तो शेगांवास गेला असता, श्रीमहाराजांनी तो गाडीवान आपणच होतो’ असे सूचित केले. भाऊ सद्गदित झाला आणि वारंवार श्रीमहाराजांच्या चरणांस वंदन करू लागला.

पुंडलिक भोकरे ह्याचे गंडांतर टळले 

मुंडगावचा पुंडलिक भोकरे त्याच्या वडिलांसोबत नित्यनेमाने शेगांवची पायी वारी करीत असे. एकदा गावामध्ये प्लेगची जोरदार साथ आली. पुंडलिक साथीचा बळी ठरला. पायी वारी करिता घरून निघताना त्याला कणकण जाणवू लागली तरीही कुणाला काही न सांगता तो पित्यासोबत निघाला. अर्ध्या रस्त्यात तापाचा जोर वाढला. काखेत गाठ आली. पुंडलिकाचे वडील घाबरले. परंतु पुंडलिकाने त्यांना विनंती केली की, ‘कसेही करुन शेगांवला जायचे. मी जर का अर्ध्या वाटेत मेलो तर निदान माझे शव तरी शेगांवला न्यावे पण वारी अर्धवट सोडू नये.’ मजल दरमजल करीत बापलेक कसेबसे शेगांवास आले. पुंडलिकाने श्रीमहाराजांचे दर्शन घेऊन स्वतःस त्यांच्या चरणावर झोकून दिले. हे पाहून परमदयाळू श्रीमहाराजांनी त्यांची स्वतःचीच काख दाबली, त्यासरशी पुंडलिकाच्या काखेतील गाठ नाहीशी झाली. पुढे श्रीमहाराजांनी पुंडलिकाच्या घरुन आणलेला प्रसाद ग्रहण करताच पुंडलिकाचा तापही ओसरू लागला आणि काही वेळातच तो ठणठणीत बरा झाला.

श्रीमहाराजांनी गणू जवरे यांस जीवनदान दिले 

शेगांवात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने सुरुंग लावून विहिरी तयार करण्याचे काम सर्वत्र चालले होते. अशाच एका विहिरीवर गणू जवरे काम करीत होता. विहिरीस सुरुंग लावण्याचे काम सुरू असताना सुरुंगासाठीची दारू मध्येच अडकून राहिल्याने पेट घेत नाही म्हणून मुकादमाने गणूला पाठवले. हे काम जोखमीचे होते, मात्र घरच्या गरीबीमुळे गणूपुढे कुठलाच पर्याय नव्हता. त्याने दारूची पुंगळी पुढे सरकवली तशी सुरुंगाचे धडाधड स्फोट झाले. गणूने श्रीमहाराजांचा धावा केला, तेवढ्यात त्याच्या हाती दगडाची कपार लागली. श्रीमहाराजांच्या कृपेने, कपारीच्या आडोशाला बसलेला गणू जिवावरच्या संकटातून वाचला. सुरुंगाच्या स्फोटामुळे इतस्ततः दगड उडाले असले तरीही गणूला मात्र इजा झाली नाही. श्रीमहाराजांच्या कृपेने गणू जवरे सुखरूप व सहीसलामत बाहेर पडला.

बंडुतात्यास धनलाभ

सर्वांना मदत करणारा, प्रसंगी कर्ज काढून सर्वांची सरबराई करणारा बंडूतात्या जेव्हा कर्जबाजारी झाला तेव्हा आप्त व सगेसोयऱ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. सर्वांनी त्यास धिक्कारले. निराश झालेल्या बंडूतात्याने अखेर हिमालयात जाऊन आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार तो रेल्वे स्टेशनवर तिकीट काढावयास गेला असता तिथे अवचितपणे आलेल्या एका ब्राह्मणाने, त्याला शेगांव येथे श्रीमहाराजांच्या दर्शनास जाण्याचा सल्ला दिला. बंडूतात्या श्रीमहाराजांच्या दर्शनास गेला तेव्हा रेल्वे स्टेशनवर भेटलेला माणूस अन्य कुणी नसून श्रीमहाराजच होते हे त्यास उमगले. श्रीमहाराजांनी त्याला व्यवहारोपयोगी युक्तीच्या चार गोष्टी सांगून शेतातील बाभळीच्या झाडाखाली खोदण्यास सांगितले. श्रीमहाराजांच्या सांगण्यानुसार बंडूतात्याने शेतातील बाभळीच्या झाडाखाली खोदकाम केले असता त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडा मिळाला. या अकस्मात धनलाभामुळे बंडूतात्या ऋणमुक्त झाला व पुढे सुखाने संसार-प्रपंच चालवू लागला.

श्री गजानन महाराज चित्रकथा पुस्तक – लेखक श्री विवेक दिगंबर वैद्य