महाराजांचे अवतरण

श्री गजानन महाराजांचे शेगांव मधील प्रगटीकरण

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगांव मध्ये २३ फेब्रुवारी १८७८, माघ कृष्ण सप्तमी यादिवशी प्रगट झाले अथवा प्रथम दिसले. हा दिवस त्यांची जयंती नसून प्रगट दिवस आहे, तो आज संपुर्ण जगात साजरा केला जातो. शेगाव मध्ये मठाधिपती देविदास पातुरकरांच्या मुलाची ऋतूशांती होती. भोजनाच्या उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या, त्याची शिते वेचून खात असताना बंकटलाल आगरवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांनी महाराजांना प्रथम पाहिले. आजानुबाहू महाराजांची सूर्याप्रमाणे सतेज कांती होती आणि त्यांची दृष्टी श्रेष्ठ योग्याप्रमाणे नासाग्रावर स्थिर झाली होती. उष्ट्या पत्रावळीतील शिते वेचून खाण्याची कृती “अन्नम ब्रम्हेती” (अन्न म्हणजे ब्रह्म, वाया जाऊ नये) अशी उपनिषदांमधील उक्ती स्वानुभवे समजावून देणारी होती.

महाराज स्वतःला अनेकवेळा “गण्या” नावाने संबोधत म्हणून “गजानन महाराज” हे नाव प्रथम १९०५ मध्ये अमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांनी सुचवले. तोपर्यंत महाराजांना अवलियाबाबा, गणपतबाबा, गिणगिणेबुवा, गिणगिणातबुवा अशा अनेक नावांनी ओळखले जात असे.