आमच्याबद्दल

ह्या परिवारा संबंधित

“ॐ श्री गजानन गुंजन विश्व परिवार” हा संत शिरोमणी श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या भक्तांचा एक विशेष आंतरराष्ट्रीय समूह. पंचखंडातील भक्तांनी, देशांचे व सीमांचे बंधन ओलांडून, एकत्रपणे, कुठल्याही आसक्ती न ठेवता, निरपेक्षपणे, केवळ माऊलींविषयीची भक्ती व अध्यात्मिक यात वृद्धि व्हावी या उद्देशाने स्थापित केलेला हा समूह. जणू काही माऊलींनीच जमवलेली ही भक्तांची जुडी! भारत व भारताबाहेर ज्या ज्या ठिकाणी गजानन महाराजांची भक्ती चालते, तेथील प्रतिनिधी एकत्र आले आहेत. हा परिवार, निवडकपणे काही शनिवारी श्री गजानन महाराजांच्या निस्सीम आणि सुप्रसिद्ध भक्तांची व्याख्यानमाला इ-माध्यमातून प्रसारीत करतो आणि त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. महाराजांचे भक्त असा हा सत्संग पाहून आणि ऐकून भक्तीचा आनंद लुटत आहेत. या उपक्रमातून महाराजांचे भक्त जोडले जात असून सकारात्मक वातावरण निर्मितीसाठीही मदत होत आहे.

आमची धारणा

काय – तर श्री गजानन महाराजांच्या यांच्या भक्तीची ज्योती  प्रज्वलीत आणि प्रफुल्लित करणे 

कोण – तर भक्तिरसात रंगलेले श्रींचे भक्त, तसेच नवीन, तरुण व उत्सुक अशी पिढी  

कसे  – तर सगळ्यांना मुक्त हस्ताने निस्वार्थपणे श्रींची भक्ती आणि संशोधन याचे प्रसारण  

का – तर समाजाची चेतना जागृत होण्यासाठी, तसेच “गणी गण गणांत बोते” या पावन मंत्रात  सूचित केल्याप्रमाणे “ब्रह्म सर्वव्यापी आहे, प्रत्येक जीवात आहे आणि सर्वत्र आहे… ” याची प्रत्येकाला जाणीव होण्यास मदत व्हावी यासाठी.

या इ-संकेत स्थळाची उद्दिष्टे

असे एकमेव ठिकाण कि जेथे मिळेल – 

  • श्री गजानन महाराज आणि शेगांव यांची माहिती
  • श्री गजानन विजय पोथीची डाऊनलोड करता येण्याजोगी प्रत, प्रार्थना आणि स्तोत्रं
  • जुन्या कार्यक्रमांचे तपशील आणि दुवे  
  • प्रकाशित झालेले गजानन गुंजन या ई-मासिकाचे अंक  
  • श्री गजानन महाराजांशी संबंधित भक्तांनी लिहिलेले लेख किंवा लिखाण यांचे प्रकाशन स्थळ 
  • विविध भक्तांना संपर्क वाढविण्यासाठीची संधी.

ॐ श्री गजानन गुंजन विश्व परिवाराची यात्रा

या समूहाची मूळ रूपातील खरी सुरुवात पाहण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. १९९९ च्या गुरुपौर्णिमेला श्री गजानन महाराजांच्या वरील प्रथम इ-संकेत स्थळाचे अनावरण    (www.gajanan-shegaon.com) शेगांव संस्थानाचे अध्यक्ष आदरणीय श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हस्ते झाले. त्याच सुमारास “गजानन-शेगांव-प्रचार-परिवार” या नावाने एका ‘याहू’ गटाची हि स्थापना केली गेली आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असलेले श्रींचे भक्त एकप्रकारे तंत्रज्ञानाद्वारे जोडले गेले. तद्नंतर काही भक्तांनी “गजानन गुंजन” नावाचे ई-मासिक सुरु केले, जे आजतागायत अखंड सुरु आहे. यामध्ये शेगांव आणि श्री गजानन महाराज यांच्याविषयी विविध लेख, कविता, भक्तांना आलेले अनुभव, ग्रंथातील पाककृती, यात्रा-वर्णन इत्यादी साहित्य प्रकाशित होत असते. आजही ‘याहू’ गट आणि गजानन गुंजन च्या भक्तांच्या संख्येमध्ये प्रतिपदेच्या वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे वाढं/ होतच आहे.

आमची अपेक्षा

‘ॐ श्री गजानन गुंजन विश्व परिवार’ या पीठाद्वारे सर्व खंडांतील भक्तांना प्रेरणा मिळावी, त्यांच्यातील संपर्क वाढावा आणि जगाच्या प्रत्येक भागात श्रींचे वैभव आणि शिकवण यांचं प्रचार आणि प्रसार व्हावा, हीच प्रामाणिक इच्छा.

|| गणी गण गणांत बोते ||ओवी क्र. ९.३०

श्री रामनवमी, २ एप्रिल २०२०, या पवित्र दिवशी भक्तांनी एकत्र येऊन “श्री गजानन, जय गजानन” या नामजपाची एक दिवशीय विश्वव्यापी साखळी बनविण्याची योजना तयार केली.या उपक्रमाला भारतातील अनेक छोट्यामोठ्या ठिकाणांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय सिंगापूर, मलेशिया, इंग्लंड, ऑस्ट्रिया, जर्मनी, मध्यपूर्व खाडी देश, युरोप, कॅनडा, तसेच अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरातून भाविकांनीहि नामजपाची हि साखळी आपलीशी केली. ८० लक्ष पेक्षाही जास्त वेळेस संपूर्ण जगामध्ये “श्री गजानन जय गजानन” याचे तरंग उमटले.