माऊली बद्दल

श्री गजानन महाराजांविषयी थोडेसे

महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि निर्वाणभूमी. या संतांच्या माळेतील मेरुमणी विदर्भातील संतश्रेष्ठ गजानन महाराज होय. श्री गजानन महाराज २३ फेब्रुवारी १८७८ रोजी शेगाव येथे प्रगट झाले आणि ८ सप्टेंबर १९१० रोजी यांनी संजीवन महासमाधी घेतली. महाराजांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला, शेगावला ते कसे आले, याची कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अनेकांचे प्रबोधन केले. श्री शंकर भट्ट यांनी इ. स. १३२० ते १३५० मध्ये लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील अध्याय ४१ मध्ये म्हटले आहे की :

“श्रीपादांचे थोरले बंधू श्रीधर शर्मा हे रामदास स्वामी म्हणून जन्माला येतील तर ते पुढे शिवग्राम अर्थात शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होतील. त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र-महिमा अपरंपार वाढेल”

श्री गजानन विजय ग्रंथातील ९ व्या अध्यायामध्ये ह. भ. प. संतकवी दासगणू महाराज यांनी लिहिल्या-प्रमाणे गजानन महाराजांनी बाळापूरमध्ये बाळकृष्ण-बुवा रामदासी यांना रामदास स्वामींच्या रूपात दर्शन दिले.

श्री नागलकर आणि श्री निमोणकर यांनी महाराजांचे चरित्र लेखन करण्याचा प्रयत्न केला असून त्यात महाराजांचे प्रगट-वर्ष  १८८८ असे लिहिले आहे. परंतु १९३९ मध्ये लिहिलेला प्रासादिक, रसाळ श्री गजानन विजय ग्रंथ शेगाव संस्थानानी अधिकृत केलेला आहे, त्यात महाराजांचे प्रगट-वर्ष  १८७८ आहे. त्यामुळे आपण प्रगट-वर्ष १८७८ हेच प्रमाण मानुयात.

श्री गजानन महाराज हे अवधूत आहेत, असे योगी आहेत की जे परमेश्वराशी भक्तांची जवळीक साधतात आणि भूत, भविष्य व वर्तमानकाळावर सहज विजय मिळवतात. प्रेमाने आपण म्हणतो “माउली” की जी केवळ आपल्या मुलांच्या भौतिक आणि आध्यात्मिक कल्याणाची काळजी घेत असते आणि सर्व परिस्थितीत पाठीशी खंबीरपणे उभी असते. महाराजांनी आपला पार्थिव देह सोडून संजीवन समाधी घेऊन अनेक वर्षे उलटली तरी त्यांच्या भक्तांना वेगवेगळे अनुभव आशीर्वादरुपी देऊन त्यांना मार्गदर्शन करतात, हे त्रिकाळ सत्य आहे आणि याची अनुभूती आपण शुद्ध अंतःकरणाने घेऊ शकतो. असे गजानन महाराज भक्तांचे सद्गुरू आणि पदनतांचे कल्पतरू आहेत जे आयुष्याला योग्य कलाटणी देतात.

महाराज अगदी कमीत कमी बोलत आणि आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या गूढ बोलण्याचा अर्थबोध तात्काळ होत नसे. अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी त्यांच्या वाणीचा खरा अर्थ संबंधित लोकांना कळून येई. त्यांची कृती अतर्क्य होती. महाराज कायम स्वतःमध्ये दंग असत आणि भजन “चंदन चावल बेलकी पतिया । शिवजीके माथे धरो रे ।।” गुणगुणत किंवा “गण गण गणांत बोते”, “आपस्तम्बू वैदुही”, “येश्मिस्तम्बू वैदुही” असे काहीतरी पुटपुटत. काही उल्लेख आहेत की महाराज वायुवेगाने इच्छित स्थळी काही क्षणातच पोहचू शकत. मानवी रुपातले हे परब्रह्म त्यांच्या भक्तांसाठी स्मरणगामी असून आजही हाकेला “ओ” देणारे आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपामध्ये तर कधी स्वप्नामध्ये सुलभ मार्गदर्शन करून भक्तिपंथाचे निधान जोडतात.