महाराजांची समाधी


श्री गजानन महाराज संजीवन महासमाधी व आश्वासन

गजानन महाराजांनी ऋषिपंचमी च्या दिवशी ८ सप्टेंबर १९१० रोजी संजीवन महासमाधी घेतली. समाधी घेण्याआधी २ वर्षे महाराजांनी समाधीचे सूतोवाच केले होते. सध्याच्या समाधीगृहाकडे बोट दाखवत “तिथेच राहीन रे!” असे उद्गार काढले होते. समाधी घेण्याच्या १ दिवस आधी चतुर्थीला महाराज भक्तांना म्हणाले “गणेश पुराणात कथा आहे की चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन करून दुसरे दिवशी विसर्जन करावा, त्याप्रमाणे भक्तहो तुम्ही या पार्थिव देहाला विसर्जित करण्याची वेळ आली आहे. यत्किंचित दुःख करू नका कारण तुम्हा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी आम्ही इथेच राहणार आहोत. भक्तहो तुमचा कदापि विसर पडणार नाही.” महाराज पुढे म्हणाले “शरीर हे वस्त्रापरी आहे आणि त्याला बदलणे गरजेचे आहे असे भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे”. दुसरे दिवशी ऋषिपंचमीला सकाळी ८ च्या दरम्यान पद्मासनात स्थिर होऊन प्राण रोधून मस्तकी धारण केला आणि मुखातून शब्द आले “जय गजानन”!

महाराजांनी समाधी घेतल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि लोक शेगावकडे धावू लागले. शेगांववर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेक भक्तांच्या स्वप्नामध्ये जाऊन दृष्टांत देऊन भक्तवत्सल महाराज आपल्या समाधीची वार्ता कळवते झाले.

डोणगांवचे गोविंदशात्री यांच्या सांगण्यानुसार समाधी घेतल्यावर श्रींचे अंग गार झाले आहे का हे तपासण्यासाठी श्रींच्या डोक्यावर लोण्याचा गोळा ठेवण्यात आला आणि काय आश्चर्य तो गोळा वितळू लागला म्हणजेच अंग गार झाले नव्हते. शास्त्री म्हणाले “एक दिवस काय, या समाधी स्थितीत महाराज वर्षभर आणि पुढे असेच निःसंशय राहू शकतात, पण असे करणे अनुचित होईल तरी सर्व भक्त आले की स्वामींना समाधी देऊयात”. भक्तांनी हे वचन शिरोधार्य केले. महाराजांची समाधी ही संजीवन आहे म्हणजेच देह सोडला तरी प्राण मस्तकी धारण केलेले आहेत.

अपार भक्तांचा मेळा शेगांवला जमला,७२ दिंड्या आल्या, रस्ते सारवासारवी करून सुशोभित करण्यात आले. नक्षीदार रांगोळ्या काढल्या गेल्या, दुतर्फा दीपोत्सव केला गेला. समाधी अवस्थेतील पद्मासनस्थित श्रींना फुलांनी मढवलेल्या रथात स्थानापन्न करवून, रात्रभर मिरवणूक काढण्यात आली. महाराजांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी लोक आतुर झाले होते. नानाविध खिरापती वाटल्या गेल्या. हजारो भक्त विठ्ठलाचा नामगजर – भजन यात दंग होऊन रथामागे चालत होते. तुळस, बुक्का, गुलाल आणि अनंत फुले वाहिली गेली आणि फुलांखाली महाराज जणू झाकून गेले.

श्रींचा रथ बापूना काळे यांच्या घरावरून जात असताना त्यांच्या पत्नीने लहानग्या नामदेवाला श्रींच्या पवित्र चरणांवर टेकवले. काही क्षण श्रींनी समाधी अवस्थेतून डोळे उघडून नामदेवावर कृपाकटाक्ष टाकला. या आशीर्वादामुळे नामदेवाने पुढे भरघोस यश संपादन केले. पुढे पुंडलिकबाबा भोकरे यांनीही श्रींना शेवटच्या दर्शनासाठी कळकळीची विनंती केली आणि माऊलींनी क्षणभर डोळे उघडून स्मित हास्य केले आणि त्यांची इच्छा पूर्ण केली. अशा ज्वलंत प्रसंगांवरून साक्ष पटते की श्रींची समाधी ही संजीवन समाधी आहे, केवळ भक्तीसाठी व्याकुळ असलेली ही माउली एका हाकेसरशी धावून येणारी आहे, तर काही प्रसंगी हाकेआधीच पोहोचणारी आहे.

रात्रभर थाटामाटात चाललेली मिरवणूक सूर्योदय होताच मठात परतली. श्रींच्या देहावर अखेरचा रुद्राभिषेक केला गेला. पंचोपचार पूजा आणि आरती पश्चात नामगजर केला गेला. शास्त्राप्रमाणे श्रींची मूर्ती उत्तराभिमुख आसनस्थ केली आणि भक्तांनी अखेरचे दर्शन घेतले. “जय स्वामी गजानन” च्या गजरात मीठ, अर्गजा, अबीर यांनी गार भरून त्यावर शिळा लावून दार बंद केले गेले. दहा दिवसांपर्यंत समाराधना होऊन अनेक भक्तांनी स्वामींचा प्रसाद ग्रहण केला.

समाधीनंतर एक दीड वर्षांनी हरी पाटीलांना महाराजांचा विरह सहन होत नव्हता आणि एक दिवस त्यांनी असह्य होऊन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी समाधीवरील शिळा सरकवली. महाराजांची दिव्य मूर्ती जणू काही नुकतीच महासमाधी घेतली आहे अशी तेजस्वी दिसत होती.

श्री गजानन विजय ग्रंथांमधील १९ व्या अध्यायातील ओवीमध्ये संजीवन महासमाधी घेण्यापूर्वी श्रींनी भक्तांना दिलेले आश्वासन पुढीलप्रमाणे:

मी गेलो ऐसे मानू नका । भक्तीत अंतर करू नका । 

कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच ।। ३११ ।।

याची प्रचिती आजही आपल्याला श्रींच्या कृपेने प्राप्त होते. 

श्री गजानन जय गजानन

श्रींची गादी आणि विश्रांती स्थान
श्रींचे चिरविश्रांती स्थान, गादी आणि पारायण सभागृह
विठ्ठल रखुमाई मंदिर आहे जिथे महाराज महा समाधीत दाखल झाले