पोथी बद्दल माहिती

पोथी बद्दल माहिती

श्री गजानन विजय ग्रंथाचा इतिहास

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज (शेगांव) यांनी १९१० साली संजीवन महासमाधी घेतली. यानंतर बऱ्याच वर्षांनी डिसेम्बर १९३९ मध्ये शेगांव संस्थानाचे तत्कालीन व्यवस्थापक रा. रा. श्री रामचंद्र कृष्णाजी पाटील आणि श्री रामदेव सुखदेव मोदी यांच्या सोबत निवडक भक्तांसह नाशिकला आले. साक्षात परब्रह्म सगुण स्वरूपात शेगांवात अवतरले आणि संजीवन समाधी घेऊन स्थित झाले, त्याचे गुणगान करून पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन व्हावे हा प्रामाणिक हेतू त्यांच्या मनात होता. नाशिकचे श्री लक्ष्मण पांगारकर त्याकाळी सखोल अभ्यासपूर्ण लिखाणासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी पांगारकरांना श्री गजानन महाराजांचे चरित्र पद्य रूपात लिहिण्याची विनंती केली. शेगांव संस्थानाचे दिवाणजी श्री रतनसा सोनावणे (१९०० – १९८०) यांनी काही कागदपत्रे आणि अनुभव जमा करून ठेवले होते. श्री पांगारकर यांनी पद्यरूपात चरित्र लेखनासाठीसाठी पंढरपूरला तेव्हा असलेले श्री गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराज (जन्म: ६ जानेवारी १८६८ – समाधी: २६ नोव्हेंबर १९६२) यांचे नाव सुचवले. दासगणू महाराज त्यांच्या ओघवत्या रसाळ शैलीतील अध्यात्मिक लेखनामुळे नावरूपास आले होते. शेगांवच्या मंडळींनी नाशिकहून पंढपूरसाठी प्रस्थान केले. 


दासगणू महाराज विष्णुसहस्रनाम पूर्ण करून शेगांवहून आलेल्या मंडळींना भेटले. मंडळींनी दासगणू महाराजांना श्री गजानन महाराजांचे चरित्र पद्य रूपात लिहिण्याची विनंती केली. दासगणू महाराज यांनी शिर्डी साईबाबांच्या तोंडून श्री गजानन महाराजांच्या विषयी ऐकले होते. साईबाबा श्री गजानन महाराजांना थोरले बंधू मानत असत. तसेच साईबाबांच्या सांगण्यावरून अकोटच्या नरसिंगजींचे चरित्र लेखनासाठी दासगणू महाराज अकोटचा प्रवास करत असताना श्री गजानन महाराजांचे दर्शन झाल्याचे दासगणू महाराजांना स्मरले. श्री रामचंद्र पाटील आणि इतर भक्त मंडळी यांची विनंती, हा ईश्वरी संकेत मानून, त्यांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया पुणे येथे पूर्ण झाल्यावर शेगांवला प्रत्यक्ष येऊन श्री गजानन महाराजांचे चरित्र लिहिण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ठरल्याप्रमाणे विशिष्ट दिवशी सकाळी ९ वाजता दासगणू महाराज शेगांवच्या रेल्वे स्थानकावर पोचले. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शेगांवकरांनी हारतुऱ्यांसह अगोदरच करून एक सुशोभित रथ सुद्धा आणला होता. त्या रथामध्ये स्वतः न बसता दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांची प्रतिमा रथामध्ये ठेवून, त्या रथामागून इतर लोकांबरोबर चालत ते मंदिरात पोहोचले. मंदिरामध्ये पोचताच दासगणू महाराजांनी श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. श्री रामचंद्र पाटलांनी त्यांना लेखन करण्याची विनंती केली. ज्या ठिकाणी या पवित्र ग्रंथाची निर्मिती झाली त्या दोन खोल्या मारुती मंदिराच्या मागील भक्त निवास क्र. २ येथील आहेत. 


  श्री  रतनसा सोनावणे यांनी अगोदरच सुपूर्त केलेली कागदपत्रे आणि अनुभव दासगणू महाराजांनी अनुक्रमे लावली. महाराजांचे भक्त आणि आसपासच्या जेष्ठ नागरिकांनाकडून शहानिशा करवून घेतली. जे जे प्रसंग त्यांना अयोग्य वाटले ते ते त्यांनी लिहायचे टाळले. यानंतर दासगणू महाराजांनी २ – ३ तरुणांना निवडले की जे सुवाच्च्य अक्षरात वेगाने आणि शुद्ध लिहू शकतील. केवळ दुसरी इयत्ता पास असलेले पण तल्लख बुद्धीचे श्री छगन बारटक्के यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्याचप्रमाणे गण गणे उकीर्डा, रतनसा सोनावणे यांनी देखील सहाय्य केले. छगन बारटक्के दासगणू महाराजांना प्रसंग वाचून दाखवत, दासगणू महाराज तात्काळ अधिकार वाणीने ओवीबद्ध करत आणि लेखनिक भराभर लिहून घेत. लेखनानंतर अध्यायाचे जाहीर वाचन केले जाई. या दैवी प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी तुंबळ गर्दी उसळे आणि लोक लक्षपूर्वक भावभक्तीने कानात साठवून ठेवत. 
ग्रंथ लेखनाचे कार्य पूर्ण झाल्यावर संस्थानच्या अधिकाऱ्यांनी दासगणू महाराजांचा यथायोग्य सत्कार करून मनःपूर्वक आभार मानले. दासगणू महाराजांनी कुठलेही मानधन न घेता, ग्रंथाचे हक्क संस्थानकडे सोपवले. जड अंतःकरणाने शेगांवकरांनी दासगणू महाराजांना निरोप दिला. 


१९३९-४० साली, श्री गजानन महाराजांच्या संजीवन समाधीच्या ३० वर्षे पश्चात, दासगणू महाराजांनी २१ अध्यायांचा, ३६६९ ओव्यांचा रसाळ आणि प्रासादिक ग्रंथ आपल्या हातात सुपूर्त केला, नव्हे श्री गजानन महाराजांनीच त्यांच्याकडून लिहून घेतला. लाखो भक्तांचा उद्धार करू शकणारे, सतत मार्गदर्शन करणारे, घराघरात पोहोचलेले, नित्यपठणाचे असे शब्दमाधुर्य हा आजच्या काळातील एक अजब चमत्कारच आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचे भाषांतर आजतागायत इंग्रजी, हिंदी, गुजराथी, कानडी, तेलगू आणि तामिळ मध्ये संस्थानकडे उपलब्ध आहे. काही भक्तांना संपूर्ण पोथी मुखोद्गत असून पारायणाच्या वेळेस सभागृह पूर्ण भरलेले असते. प्रत्येक अध्यायाचे काही विशिष्ट महत्व असून त्याचे श्रद्धापूर्वक पारायण केल्यास श्री गजानन महाराजांच्या कृपेने फळ अटळ आहे. 


।। श्री गजानन । जय गजानन ।।

*** वरील परिच्छेद ‘OCEAN OF MERCY-DIVINE EXPERIENCES OF GAJANAN MAHARAJ’ या पुस्तकातील उतारा आहे आणि लेखकाच्या परवानगीने पुनरुत्पादित करण्यात आली आहे.