शेगाव संस्थान व मंदिर – प्रेम, सेवा आणि भक्तीची गंगा
गजानन महाराज संस्थान हे विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट असून शिस्तबद्ध, प्रामाणिक, आध्यात्मिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. मंदिरात सेवेकरी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा यादी असून त्यासाठी काही वर्षेसुद्धा तिष्ठत राहावे लागते. मंदिराचे व्यवस्थापन प्रामाणिकपणा, अत्यंत साधेपणा आणि यात्रेकरू अथवा वारकरी यांच्याविषयी आदर बाळगणारे आहे. सेवाधारी भक्त आपल्या गुरूप्रेमासाठी नम्रपणे स्वयंसेवक म्हणून काम करतात. आसपासच्या खेड्यापाड्यातून तीसच्या गटांमध्ये स्वयंसेवकांची नोंदणी करून एक महिना क्रमावर्तन (शृंखला) तत्त्वावर, निस्वार्थीपणे विनामूल्य सेवा प्रदान करण्याची प्रथा आहे. २०२० साली कोव्हीड च्या महामारीच्यावेळेस या संस्थेने रुग्णवॉर्ड आणि बेड ची निर्मिती केली आणि हजारो लोकांना मोफत अन्न वाटप केले. भारतात SAP तंत्रज्ञान आत्मसात करणारे हे पहिले मंदिर आहे.
श्री गजानन महाराज संस्थान हे शेगावला दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरूंची अथवा वारकऱ्यांची उत्तम काळजी घेणारे संस्थान म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. तीन दिवसांपर्यंत निवासाची व्यवस्था हे संस्थान करते. श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी भक्तनिवास, आनंदसागर-संकुल, विसावा इत्यादी ठिकाणी राहण्याची सोय, स्वच्छ सुविधा आणि भोजन माफक दरामध्ये पुरवते. सकाळी ९ पासून – रात्री ९ पर्यंत रेल्वे स्टेशनहून मंदिरापर्यंत बसने मोफत वाहतूक भक्तांना फायदेशीर ठरते. मंदिर परिसरात महाराजांच्या भक्तांना दररोज बारीमध्ये महाप्रसाद दिला जातो.
लोकसेवा ही ईश्वरसेवा या तत्वावर अनेक समाजसेवा उपक्रमसुद्धा श्री गजानन महाराज संस्थान चालवते.
श्री गजानन महाराज मंदिर परिसरातील काही छायाचित्रांचे अवलोकन करून महाराजांच्या चरणी लीन होऊयात